कळंब तालुक्यात एकूण ६४७०० शेतकऱ्यांची संख्या, १६८८४ शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही
कळंब: शासनाने शेतकऱ्यांना विविध कृषी योजना, अनुदान, कर्ज, पीक विमा,बाजारपेठेची माहिती आणि तांत्रिक सेवा जलद व पारदर्शकपणे मिळाव्यात यासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केला आहे. मात्र, कळंब तालुक्यातील सुमारे १६८८४ शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी तयार झालेला नाही. कळंब महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी जनजागृती केलेली आहे, कळंब तालुक्यात एकूण ६४७०० शेतकऱ्यांची संख्या आहे. यातील ४६३०० हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे.
आयडी काढून घेणे गरजेचे
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने वेळेवर उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण जास्तीत जास्त आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसीत करणे, शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या प्रक्रियेत सुलभता आणणे व करण्यात येत आहे. उच्च-गुणवत्तेचा डेटा व ॲग्रि-टेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवा देण्यासाठी फार्मर आयडी शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आला आहे.
आयडीमुळे योजनांची माहिती मिळाली
शासनाने फार्मर आयडी बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे मी फार्मर आयडी काढलेला आहे. या फार्मर आयडीमुळे मला पिकविमा भरता आला आहे. यासोबत शासनांच्या विविध योजनांची माहिती या आयडीमुळे मला मिळाली.
– स्थानिक शेतकरी
कळंब तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे. मात्र अद्यापही नाव बदल दुरुस्ती करिता तलाठी स्तरावर ११००० प्रलंबित, स्थलांतरित २०२०, इतर कारणामुळे प्रलंबित ३८६४ असे एकूण १६८८४ या सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे. यापैकी मयत शेतकरी १५१६ आहेत.
आयडी तलाठी स्तरावर प्रलंबित
विविध कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची ऑनलाइन नोंदणी करूनही त्यांचे फार्मर आयडी तलाठी स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. सध्या पिक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु फार्मर आयडी शिवाय पिक विमा भरता येणार नाही. त्यामुळे शेकडो शेतकरी चिंतेत आहेत. फार्मर आयडी नसल्यामुळे पिक विमा भरता येत नाही.
नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही
गावपातळीवर शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करता येत असून फार्मर आयडी देण्यात येतो. कृषी विभागाच्या माहितीनुसार अग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे. फळपीक विमा योजनेबरोबरच खरिपातील पिकांच्या विमा अर्जासाठीसुद्धा फार्मर आयडी आवश्यक असणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विलंब करू नये
कृषी विभागाच्या विविध योजनांकरिता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. या आयडीमुळे सुलभ, पारदर्शक पध्दतीने योजनांचा लाभ मिळण्यासाठी वापर होईल. यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता फार्मर आयडी काढुन घ्यावा.
– हेमंत ढोकले, तहसीलदार
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही त्यांना पीक विम्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येणार आहेत. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन कृषी विभाग करत आहे. मात्र तरी शेतकरी दुर्लक्ष करत असल्याने त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांनाच होण्याची शक्यता आहे.