सोयाबीन, उडीद, मुग, तुर पिकांचे मोठे नुकसान; धाराशिव जिल्ह्यात पंचनाम्याची मागणी
अतिवृष्टीमुळे रोगराई, फुलगळ आणि उत्पन्नात घट; शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे – आमदार कैलास पाटील
धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
आमदार पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सोयाबीन, उडीद, मुग, तुर या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यातील धाराशिव ग्रामीण (68.8 मिमी), ढोकी (168.5 मिमी), जागजी (66.3 मिमी), तेर (168.5 मिमी), कळंब तालुक्यातील कळंब (164.5 मिमी), इटकुर (164.5 मिमी), येरमाळा (82.3 मिमी), मोहा (123.8 मिमी), शिरोढोण (117 मिमी), गोविंदपूर (168.5 मिमी) तसेच तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग (66 मिमी), भूम तालुक्यातील ईट (77.8 मिमी), वाशी (145.3 मिमी), पारगाव (91 मिमी), तेरखेडा (82.3 मिमी) या महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
विशेषत: कळंब तालुक्यात सरासरी 136.8 मिमी पर्जन्य झाल्यामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटली असून फुलगळ व रोगराईमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिकांचे व जनावरांचे नुकसान
सोयाबीन पिकावर मुळकुज, मानकुज व शेंगकरपा या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नदीला नवीन पात्र निर्माण झाले, जमिनी खरडून गेल्या, जनावरे वाहून गेली तसेच अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रशासनावर जबाबदारी
“शेतकऱ्यांना हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अजूनही पंचनाम्याचे आदेश देण्यात आले नाहीत, त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतात. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळाली पाहिजे आणि यात कुणीही वंचित राहू नये, ही जबाबदारी प्रशासनाची आहे,” असे आमदार कैलास पाटील यांनी ठामपणे सांगितले.
आमदार पाटील यांनी शासनाला मागणी केली आहे की, जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांतील नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून अहवाल सादर करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
