धाराशिवराजकीय

भाजपला वाशी नगरपंचायतीत धक्का : विद्यमान नगरसेवकांचा राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश

शरद पवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न

धाराशिव (प्रतिनिधी): वाशी नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रवेश सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदे, आमदार मा. जितेंद्रजी आव्हाड, युवा नेते मा. रोहितदादा पवार, आमदार सुनील भूसारा, रवींद्रजी पवार, युवक राष्ट्रीय अध्यक्ष फाहाद अहमद, तसेच शिवराज बांगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते नगरसेवकांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले.

वाशी नगरपंचायतीतील भाजपाचे नगरसेवक बळवंतराव (दादा) कवडे, जुबेर अहमद काझी, सचिन कवडे, विलासराव देशमुख (भाजप शहराध्यक्ष), ज्ञानेश्वर पाटील तसेच इतर पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये प्रवेश करून स्थानिक राजकारणात नवा संदेश दिला आहे.

भाजपमधून इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवकांचे निर्गमन हे स्थानिक राजकारणातील मोठे बदलाचे चिन्ह मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चा प्रभाव वाढविण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला आहे.

वाशी नगरपंचायतीत येणाऱ्या काळात सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपसाठी हा धक्का मानला जात असून राष्ट्रवादीसाठी बळकटी ठरणारा टप्पा ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!