कळंबराजकीयस्थानिक बातम्या

कळंब शहराला मोठा दिलासा : ६८ कोटींच्या योजनेतून दररोज ८० लाख लिटर शुद्ध पाणीपुरवठा

५४ किमी पाईपलाईन, नव्या टाक्या व सौरऊर्जेच्या वापरासह पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा

कळंब (प्रतिनिधी): कळंब शहरातील दीर्घकालीन पाणीटंचाई समस्येवर तोडगा काढण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला आता गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यातील अडथळे दूर झाले आहेत.

२२ जुलै २०२१ रोजी तत्कालीन नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे, आमदार कैलास दादा पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या सहकार्यामुळे तांत्रिक मान्यता मिळाली.

नगरपरिषदेतर्फे कार्यवाही सुरू असताना संजय मुंदडा यांनी पाणीआवश्यकतेचा पाठपुरावा केला. यामध्ये केवळ १.४९ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी २.३४ दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता निश्चित करण्यात आली. यामुळे शहराला दररोज ८० लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.

योजनेसाठी नगरविकास विभागाची मंजुरी आवश्यक होती. शिवसेना समन्वयक नितिन लांडगे यांच्या सहकार्याने तत्कालीन नगरविकास मंत्री व आजचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून मंजुरी मिळाली. दरम्यान काही कारणास्तव शासनाने ही योजना रद्द करण्याचा विचार केला होता. मात्र, आमदार कैलास पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही योजना वाचवली गेली. अखेर मंत्रिमंडळ समितीकडून ९.२१% कमी दराने टेंडरास मंजुरी मिळाली.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • जलशुद्धीकरण केंद्राद्वारे ५० लाख लिटर पाणी शुद्ध करून सोडले जाणार.
  • एकूण ५४ कि.मी. पाईपलाईन टाकण्यात येईल.
  • छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील जुन्या फिल्टरवर ९.०६ लाख लिटर क्षमतेचे टाकी उभारली जाणार.
  • कोटसमोर ६.९९ लाख लिटर तर पुनर्वसन सावरगाव हनुमान मंदिराजवळ ६.१३ लाख लिटर क्षमतेचे नवे टाकी उभारले जाणार.
  • योजनेत सौरऊर्जेचा वापर करून वीज बचत केली जाणार.

या योजनेचा एकूण खर्च ६८ कोटी रुपये असून, कळंब नगरपरिषदच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.

या योजनेमुळे कळंब शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघेल. शहरवासीयांना शुद्ध, मुबलक व अखंडित पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.

या योजनेसाठी प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन पालकमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे, आमदार कैलास दादा पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, शिवसेना समन्वयक नितिन लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

६८ कोटींच्या या प्रकल्पामुळे कळंब शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. अनेक वर्षांपासूनचा पाणीटंचाईचा इतिहास आता बदलणार असून, हा प्रकल्प कळंबच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!