गणेशोत्सवात मिरवणुकीस धोका; कळंबच्या रस्त्यांची दुरवस्था
मुख्याधिकाऱ्यांना माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे निवेदन; सुविधा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
कळंब (प्रतिनिधी): गणपती बाप्पाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंब शहरातील सर्व भागांतील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर माजी नगराध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे, माजी नगरसेवक सतीश टोणगे, संजय घुले, भैय्या बावीकर आणि बाळासाहेब धस यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
धनेगाव धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतानाही, शहरात चार-चार दिवस पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच, शहरात घंटागाडी न फिरल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
गणपती मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतात. मात्र शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. गांधी नगर, सावरगाव पुनर्वसन, बायपास रोड, विद्याभवन शाळा परिसर, एकशे एक नगर आदी भागांतील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, जनावरांचा बंदोबस्त करणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष आणि माजी नगरसेवकांनी दिला आहे.
