लातूरचे ॲड. अल्ताफहुसैन काझी यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार
आगाज फाउंडेशन आणि आझाद ग्रुपचा उपक्रम; शिक्षण, रोजगार आणि सामाजिक उन्नती क्षेत्रातील योगदानाची दखल
कळंब (प्रतिनिधी): आगाज फाउंडेशन आणि आझाद ग्रुपतर्फे दरवर्षी प्रदान केला जाणारा स्व. सलिमभाई मिर्झा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार यंदा लातूरचे विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲड. अल्ताफहुसैन काझी यांना जाहीर झाला आहे. शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी कळंब येथील गॅलेक्सी फंक्शन हॉलमध्ये भव्य सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक मुस्तान मिर्झा, अकिब पटेल आणि उमरान मिर्झा यांनी दिली.
स्व. सलिमभाई मिर्झा यांनी तब्बल ४० वर्षे नगरसेवक व उपनगराध्यक्ष म्हणून कार्य केले. ते तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आणि जातीय सलोखा टिकवून ठेवणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या सामाजिक योगदानाची आठवण कायम रहावी म्हणून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
३९ वर्षीय ॲड. अल्ताफहुसैन काझी हे बीसीए व एलएलबी. पदवीधर असून, मागील १८ वर्षांपासून वकिली व्यवसायासोबत सामाजिक कार्य करत आहेत. वंचित, अल्पसंख्याक आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने लक्ष केंद्रित करतात.
त्यांचे कार्यक्षेत्र विविध अंगांनी विस्तारलेले असून त्यात –
- अल्पसंख्याकांचे अधिकार संरक्षण
- शैक्षणिक संधी व शिष्यवृत्ती उपक्रम
- मानवाधिकार रक्षण
- गरिबी निर्मूलन
- रोजगार निर्मिती
- युवक सबलीकरण
या क्षेत्रातील त्यांच्या प्रयत्नांमुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, केशव सावंत, मुख्तार मिर्झा यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे.
