1500 व्या पैगंबर जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठान कळंब कडून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम!
रुग्णवाहिकेचे लोकार्पण, अनाथ मुलींसाठी मुदत ठेव योजना, संविधान प्रतींचे वाटप आणि कोरोना काळात अन्नधान्य किट वाटप अशा विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीचा आदर्श
कळंब (प्रतिनिधी): समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या दयावान प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून, त्याला मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग लाभला. संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला, उपाध्यक्ष इम्रान काझी आणि सचिव अभय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानने गरजूंसाठी दिलेला हा हातभार कौतुकास्पद ठरला आहे.
1500 वी मोहम्मद पैगंबर जयंती : लोकसहभागातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण
ना नफा – ना तोटा या तत्वावर लोकसहभागातून अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण पैगंबर जयंतीनिमित्त होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील सामान्यांना तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला.
1499 वी मोहम्मद पैगंबर जयंती : अनाथ मुलींसाठी मुदत ठेव योजना
या विशेष प्रसंगी संस्थेने अनोखी सामाजिक जबाबदारी पार पाडत अनाथ मुलींच्या नावाने मुदत ठेव रक्कम योजना सुरु केली. समाजातील दुर्लक्षित मुलींच्या भविष्यासाठी दिलेला हा हातभार समाजमनाला स्पर्शून गेला.

125 वी बाबासाहेब आंबेडकर जयंती : संविधान प्रतींचे वाटप
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 125 संविधान प्रतींचे वाटप करण्यात आले. तरुण पिढीला संविधानाच्या मूल्यांची जाणीव व्हावी व लोकशाहीच्या तत्त्वांचा प्रसार व्हावा, हा उपक्रमामागील उद्देश होता.

कोरोना काळातील मदतीचे कार्य
कोरोना संकटाच्या कठीण काळात दयावान प्रतिष्ठानने गरीब व गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य किटचे वाटप केले. लॉकडाउन काळातील ही मदत हजारो लोकांच्या पोटाला दिलासा देणारी ठरली.
सामाजिक बांधिलकीचा आदर्श
या सर्व उपक्रमांतून दयावान प्रतिष्ठानने समाजाप्रती असलेली खरी सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे.
समाजाने दिलेल्या विश्वासाचे मोल अशा उपक्रमांद्वारे फेडण्याचा आमचा प्रयत्न आहे. – इम्रान मुल्ला, अध्यक्ष
