हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठानतर्फे ऍम्ब्युलन्स सेवा सुरू
अपंग व्यक्तीच्या हस्ते लोकार्पण – आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती
कळंब (प्रतिनिधी): हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त दयावान प्रतिष्ठान व लोकसहभागातून ऍम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेचे लोकार्पण एका अपंग व्यक्तीच्या हस्ते करण्यात आल्याने सोहळ्याला सामाजिक संवेदनशीलतेचे अधिष्ठान लाभले.
मान्यवरांचा सहभाग
लोकार्पण सोहळ्यास कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत दयावान प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर सेवा
ही ऍम्ब्युलन्स सेवा पूर्णतः ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना परवडणाऱ्या दरात तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर
दयावान प्रतिष्ठान नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये आघाडीवर आहे. मागील वर्षी संस्थेने अनाथ मुलींसाठी फिक्स डिपॉझिट योजना राबविली होती. तसेच कोरोना काळात गरजूंना किराणा किटचे वाटप करून मोठ्या प्रमाणावर मदत केली होती.
भविष्यकालीन अपेक्षा
या उपक्रमामुळे रुग्णांना तातडीच्या सेवांचा लाभ मिळणार असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला दिलासा मिळेल. आगामी काळात या सेवेचा विस्तार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
