कळंबस्थानिक बातम्या

कळंब शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आदर्श उपक्रम

रस्त्यावर भटकणाऱ्या महिलेला दिला सुरक्षित आश्रय

कळंब (प्रतिनिधी): कळंब शहराच्या रस्त्यांवर काही दिवसांपासून एक मनोरुग्ण महिला तगमगत फिरत होती. अस्ताव्यस्त केस, डोळ्यात निराशेची छाया, अंगावर फाटलेले कपडे, तर पोटात अन्नाचा कण नव्हता—तिच्या त्या दयनीय अवस्थेकडे पाहून डोळे पाणावले शिवाय राहात नव्हते. गर्दीत असूनही ती एकटीच होती. लोक तिच्या जवळून जात होते, कुणी दोन क्षण दयाळूपणे बघत होते पण कुणीही तिच्या जिवाला आधार देण्यासाठी पुढे सरसावत नव्हते.

याच वेळी, समाजाने विसरलेली ही बिचारी आत्मा काही चांगल्या माणसांना भेटली. अमर चाऊस, इम्रान मुल्ला, समीर सय्यद, इरफान शेख आणि खुर्शीद शेख—हे तरुण कार्यकर्ते तिच्या वेदनांनी व्यथित झाले. त्यांना फक्त तिची दीन अवस्था दिसली नाही, तर तिच्यातील माणूस दिसला. त्यांनी थांबून विचार केला, “जर ही आपल्या आई, बहिण किंवा लेकरं असती, तर आपण काय केलं असतं?” आणि हा विचार त्यांच्या कृतीत उतरला.

त्यांनी महिलेचा हात धरला, तिच्या भीतीने थरथरणाऱ्या देहाला सुरक्षित आश्रय दिला. कोणी तिला सोडून पळाले असते, पण हे कार्यकर्ते तिच्यासाठी पुढे उभे राहिले. त्यांनी तिला बुलढाणा येथील ‘दिव्य सेवा प्रकल्प’ येथे दाखल करून दिले. आता त्या महिलेला योग्य उपचार मिळतील, आणि ती पुन्हा आयुष्याचा उजेड पाहू शकेल, अशी आशा आहे.

या घटनेतून आपल्याला उमगते—माणूस म्हणून जगणे म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. समाजाने ज्यांना वेडसर म्हणून हिणवले, ज्यांना रस्त्यांवर टाकून दिले, अशा आत्म्याला जर एखाद्याने मानवी स्पर्श दिला, तर त्यापेक्षा मोठे पुण्य दुसरे नाही.

आज या तरुण कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, मानवता अजूनही जिवंत आहे. पैसा, पद, सत्ता यांचा गर्व काही काळ टिकतो, पण एखाद्याच्या डोळ्यातून गाळलेला अश्रू पुसला की तो क्षण आयुष्यभर चिरंतन राहतो.

कळंबच्या या मुलांनी घडवलेला हा प्रसंग आपल्याला सांगतो—

“समाजाने दुर्लक्षित केलेल्यांचा हात धरला, तर आपण केवळ त्यांचे जीवन वाचवत नाही, तर आपलीही माणुसकी जिवंत ठेवतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!