रेल्वे मार्गासाठी हवाई आणि जमीन सर्वेक्षण प्रगतिपथावर
कळंब (प्रतिनिधी): कळंबकरांचे अनेक वर्षांपासूनचे रेल्वे ट्रॅकचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गासाठी जमीन आणि हवाई सर्वेक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती कळंब रेल्वे संघर्ष समितीने दिली.
हे सर्वेक्षण काम हैदराबाद येथील आर. के. इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी या कंपनीला सोपवण्यात आले आहे. कंपनीने १८, १९ व २० जुलै रोजी केज तालुक्यातील केज ते मांजरा नदी काठ आणि कळंब तालुक्यातील मांजरा नदी काठ परिसरात हवाई सर्वेक्षण केले. यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून निरीक्षण करण्यात आले.
या हवाई सर्वेक्षणात केज तालुक्यातील मांगवडगाव, लाखा, हदगाव, सारूकवाडी, चिंचोली तसेच कळंब तालुक्यातील हासेगाव (केज), बोर्डा, खेर्डा, मोहा आदी गावांचा समावेश होता. गेल्या दोन-तीन दिवसांत सातत्याने हेलिकॉप्टर फिरताना स्थानिकांनी पाहिले आहे.
सर्वेक्षणादरम्यान संबंधित भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून जमीन मोजणी व अन्य माहिती संकलित करण्यात आली. हवाई व जमिनीच्या माध्यमातून दोन्ही पातळ्यांवर काम होत असल्याचे दिसून येते.
रेल्वे संघर्ष समितीकडून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सर्वेक्षणानंतरचा अहवाल रेल्वे विभागाच्या सोलापूर, पुणे व मुंबई कार्यालयांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्यानंतरची प्रक्रिया सुरळीत पार पाडली जावी यासाठी कार्यरत असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले.
या समितीमध्ये सचिव अॅड. मनोज चोंदे, सहसचिव डॉ. अमित पाटील, प्रसिद्धी प्रमुख माधवसिंह राजपूत, तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही सक्रिय सहभाग आहे.
“या मार्गामुळे कळंब व परिसराचा सर्वांगीण विकास होईल. उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या दृष्टीने रेल्वे हा मोठा बदल घडवणारा घटक ठरेल,” असे मत समितीने व्यक्त केले आहे.