लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड यांना “समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार” प्रदान
कळंब (प्रतिनिधी): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मोत्सव केंद्रीय समिती, दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी मौजे डिकसळ (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील समाजसेवक व लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह आर्या, लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, माजी आमदार राम गुंडिले, सुभाष दाजी पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या २०-२५ वर्षांपासून बालाजी गायकवाड सामाजिक चळवळीत सक्रिय असून, अनेक आंदोलने, मोर्चे व उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर काम केले आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून त्यांना समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन विनोद जाधव, काकासाहेब मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी केले होते.
