गेवराई पंचायत समिती सभापतीच्या पतीकडून ग्रामसेविकेवर बलात्कार; फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेलची धमकी
छत्रपती संभाजीनगर (बीड प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका ग्रामसेविकेवर पंचायत समिती सभापतीच्या पतीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेदांतनगर पोलिस करत आहेत.
घटना कशी घडली?
आरोपीचे नाव दीपक सुरवसे (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे असून, २०१९ मध्ये त्याची पत्नी गेवराई पंचायत समितीच्या सभापतीपदी होती. त्यामुळे पंचायत समितीचा सर्व कारभार सुरवसे पाहत होते. सप्टेंबर २०२२ मध्ये आरोपीने पीडित महिलेला संभाजीनगर येथील व्हिट्स हॉटेलमध्ये कामानिमित्त बोलावले. तेथे आरोपीने हॉटेलमध्ये रूम बुक करून महिलेला आत बोलावले. कामाविषयी बोलण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेवर जबरदस्ती केली. विरोध केल्यास नोकरी गमवावी लागेल अशी भीती दाखवून आरोपीने बलात्कार केला.
ब्लॅकमेलिंग आणि पुढील अत्याचार
घटनेनंतर आरोपीने त्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. हे व्हिडिओ इतरांना दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर इगतपुरी (हिरण्या रिसॉर्ट्स), नाशिक तसेच संभाजीनगरमधील हॉटेलमध्येही अत्याचार केला. शिवाय पीडितेच्या पतीला मारून टाकण्याची धमकी दिली.
संभाजीनगरमध्ये केला धिंगाणा, तक्रारीत नमूद
आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. पीडित महिला संभाजीनगर येथे राहत होती. २ जुलैला आरोपीने त्या भागात येऊन गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलीस तपास सुरू
या गंभीर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नसून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
