स्वप्ननगरी वसाहतीला राज्य मार्गावरून थेट पोचमार्ग नाकारला
सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठाम निर्णय, नागरिकांना दक्षतेचे आवाहन
कळंब (प्रतिनिधी): कळंब–ढोकी राज्यमार्ग क्रमांक 208 वरील साखळी क्र. 9/600 येथे खटकळी ओढ्यालगत असलेल्या स्वप्ननगरी वसाहतीसाठी बेकायदेशीर रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याची तक्रार डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर वसाहतीतील नागरिकांच्या वाहतुकीसाठी थेट पोचमार्ग मंजूर करण्याची मागणी श्री. रामेश्वर जाधवर आणि इतरांनी विभागाकडे केली होती.
स्वप्ननगरी वसाहतीत एकूण 35 प्लॉट असून येथील रहिवाशांना सुलभ प्रवासासाठी राज्यमार्गावरून थेट रस्ता द्यावा, अशी मागणी शासन व बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. याबाबत संबंधितांकडून अधिकृत मार्गदर्शनही मागविण्यात आले होते.
बांधकाम विभागाचा स्पष्ट आदेश
28 जुलै 2025 रोजी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांनी पाठविलेल्या पत्रात, शासन निर्णय क्रमांक आरबीडी-2020/प्र.क्र.32/रस्ते-7, दिनांक 23 ऑक्टोबर 2020 चा उल्लेख करत सांगितले की –
राज्यमार्गावरून थेट पोचमार्ग देण्याची परवानगी केवळ पेट्रोल पंप, आराखड्यातील सेवा केंद्र, रेस्टॉरंट, हॉटेल यांसारख्या व्यावसायिक कारणांसाठीच दिली जाते. निवासी वसाहतींसाठी असा थेट पोचमार्ग देण्याबाबत कोणतेही शासन आदेश अस्तित्वात नाहीत.
त्यामुळे स्वप्ननगरी वसाहतीसाठी राज्यमार्गावरून थेट पोचमार्गाची मागणी शासन नियमांनुसार मान्य होऊ शकत नाही, असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पुढील आवश्यक कारवाईसाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना इशारा
डिकसळ हद्दीतील आणि कळंब शहरातील नागरिकांनी प्लॉट किंवा रो हाऊस खरेदी करण्यापूर्वी कागदपत्रांची सखोल तपासणी करावी, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य मुबीन मणियार यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, स्वप्ननगरी वसाहतीप्रमाणे बेकायदेशीर रस्ता दाखवून नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्ष राहणे आवश्यक आहे.
ही घटना नागरिकांसाठी एक धडा ठरू शकते. विकासक किंवा विक्रेत्याकडून दाखविण्यात आलेल्या सुविधांची शासन नियमांशी तुलना करूनच मालमत्ता खरेदी करावी, अन्यथा भविष्यात वाहतूक व कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
