कळंब शहरात सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा – रहिवाशांची कब्रस्तानातील झुडपे तोडण्याची मागणी
कळंब (प्रतिनिधी): कळंब शहरातील मोमीन गल्ली परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे लेखी निवेदन देऊन सय्यद शाहंशाह वली दरगाह व कब्रस्तान मधील सरकारी बाभळीचे झाडे झुडपे तातडीने तोडून परिसर मोकळा करण्याची मागणी केली आहे.
दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सादर केलेल्या या अर्जात नमूद केले आहे की, संबंधित कब्रस्तानामध्ये दफन प्रक्रिया होत असते. त्या परिसरातील सरकारी बाभळी व दरगाह परिसरात असलेल्या झाडां-झुडपांमध्ये कचरा व घाण साचून राहिल्याने अस्वच्छता पसरली आहे. परिणामी येथे साप, विंचू यांसारखे प्राणी वाढले असून नागरिकांना विशेषतः वृद्धांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक रहिवाशांनी अर्जात नमूद केले आहे की, झुडपांमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच परिसर अस्वच्छ असल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कब्रस्तानातील झुडपे तोडून व परिसर मोकळा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर इम्रान सिराज सय्यद, ॲड.अयुब नसीरखां पठाण, वसीम शेख, अकमल मुजतहीद काझी, नियामत बाबरखां पठाण, मुबीन अब्दुल बागवान, महेबुब पठाण, माजीद मणीयार यांच्या स्वाक्षऱ्या असून सर्व रहिवाशांनी नगरपरिषदेकडे तातडीने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
