कळंब : डिकसळ (ता. कळंब) येथील एसटी कॉलनी, फरीद नगर, संभाजीनगर या भागांतील नागरिक सध्या पाण्याच्या वेढ्यात अडकले असून, अक्सा मस्जिद आणि मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर तब्बल १२ फूट पर्यंत पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, पादचारी आणि लहान वाहनांची वाहतूक पूर्णतः थांबली आहे.
रहिवाशांनी सांगितले की, “दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या निर्माण होते, मात्र यंदा परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. आमच्या मुलांना शाळेत पाठवणे, ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात नेणे, किंवा किराणा आणणे अशक्य झाले आहे.”
प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “डिकसळ ग्रामपंचायत कार्यालय आणि सरपंच झोपेत आहेत का?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात, रस्त्यावरील निचरा त्वरित व्हावा आणि येथील नागरिकांचे हाल थांबावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अन्यथा, प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.