AIAPGET 2025 मध्ये कळंबच्या डॉ. शिवाई भांडे यांना राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश
कळंबची वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप – डॉ. शिवाई भांडे यांचा देशात २११ वा, ओबीसी प्रवर्गातून ९८ वा क्रमांक
कळंब (प्रतिनिधी): कळंब शहरातील डॉ. शिवाई सुमित्रा संतोष भांडे यांनी AIAPGET 2025 (All India Ayush Post Graduate Entrance Test) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत देशपातळीवर २११ वा, तर ओबीसी प्रवर्गातून ९८ वा क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे संपूर्ण कुटुंबासह कळंब शहर आणि जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.
परीक्षेबाबत माहिती
ही परीक्षा ४ जुलै २०२५ रोजी पार पडली होती. देशभरातून सुमारे ५०,००० डॉक्टरांनी ही परीक्षा दिली होती. केवळ ९५२ शासकीय जागांसाठी ही स्पर्धा होती. परिणामी ही परीक्षा अत्यंत आव्हानात्मक ठरली. निकाल ३० जुलै २०२५ रोजी रात्री ऑनलाईन जाहीर झाला.
शैक्षणिक प्रवास
डॉ. शिवाई भांडे यांनी आपले प्राथमिक शिक्षण सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय, कळंब येथे पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथून विज्ञान शाखेत झाले. त्यानंतर त्यांनी बी.ए.एम.एस. पदवीसाठी भाईसाहेब सावंत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे प्रवेश घेतला. येथे त्यांनी यशस्वीरीत्या पदवी पूर्ण केली.
पुढील दिशा
AIAPGET परीक्षेत मिळालेल्या यशामुळे डॉ. शिवाई यांचे एम.डी./एम.एस. साठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे. यामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, तसेच महाराष्ट्रातील नामवंत शासकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
प्रेरणादायी कुटुंब
डॉ. शिवाई सामान्य ग्रामीण कुटुंबातून येतात. त्यांचे वडील संतोष भांडे सर हे वैद्यकीय शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. या कुटुंबातील तीनही मुली उच्चशिक्षित आहेत – एक वकील आणि दोन डॉक्टर. शिक्षण आणि सेवाभाव यावर विश्वास ठेवणाऱ्या या कुटुंबाचा प्रवास संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.
समाजासाठी प्रेरणा
डॉ. शिवाई यांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्य आणि मेहनतीने कोणतीही परीक्षा पार करता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
कळंब आणि परिसरातून डॉ. शिवाई यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस ‘नवमत’ परिवाराकडून अनेक शुभेच्छा!