कळंब: बाबा नगर येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि देवी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या काही दिवसांपासून जलमय झाला आहे. या रस्त्यावर १ ते २ फूट पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. लहान मुले, वृद्ध नागरिक, तसेच वाहनधारकांना या रस्त्यावरून चालणे अशक्यप्राय झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी माहिती दिली की, दरवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी पाणी साचते. मात्र यंदा परिस्थिती अधिकच बिकट आहे. “आमच्या मुलांना शाळेत पाठवणे कठीण झाले आहे, किराणा आणणे, दवाखान्यात जाणे अशक्य झाले आहे. अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाने काहीच ठोस पावले उचललेली नाहीत,” अशी तक्रार नागरिकांनी व्यक्त केली.
(बाबा नगरमध्ये मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी – छायाचित्र: स्थानिक नागरिक)
रस्त्याच्या मध्यभागी साचलेल्या पाण्यामुळे पादचाऱ्यांसोबतच दुचाकी आणि इतर लहान वाहनांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी रस्त्याच्या जलनिष्कासनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
“जर प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष दिले नाही, तर आम्ही रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बोट सोडून आंदोलन करू आणि नगर परिषदेचा तीव्र निषेध करू.”
– हर्षद अंबुरे, स्थानिक नेते