कळंब (प्रतिनिधी) : डिकसळ येथील अशोक नगर व फरीद नगर भागातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश आले आहे. अत्यंत जवळून गेलेल्या ३३ केव्ही व ११ केव्ही वीज पोलमुळे संभाव्य अपघातांचा धोका निर्माण झाला होता. या धोकादायक स्थितीबाबत वारंवार निवेदन करूनही दुर्लक्ष होत असलेल्या महावितरण विभागाला आता आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जाग आली आहे.
दि. २८ जुलै २०२५ रोजी अजित मस्के व रवींद्र कुलकर्णी यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याकडे निवेदन सादर करून, पोल स्थलांतराची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
निवेदनाची गंभीर दखल घेत महावितरण विभागाने हालचाली सुरू केल्या असून, पोल स्थलांतरासाठी लागणाऱ्या निधीसंदर्भातील तांत्रिक अंदाजपत्रक जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आले होते. समितीने त्यास मंजुरी दिली असून, निधी उपलब्ध होताच कार्यादेश जारी करून काम सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी पत्राद्वारे निवेदनकर्त्यांना कळविण्यात आले आहे.
दरम्यान, पोल स्थलांतराचा अंतिम निर्णय होईपर्यंत नागरिकांचा जीवितधोका लक्षात घेता महावितरण विभागाने तात्पुरती उपाययोजना म्हणून पोलची उंची वाढवून धोक्याचे प्रमाण कमी केले आहे.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, लवकरच स्थायी समाधान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.