ग्रामीण भागातील यशाची कहाणी – डॉ. गोरख मुंडे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
(NEET PG 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 1090 मिळवून ग्रामीण भागाचे नाव उज्ज्वल)
कळंब (प्रतिनिधी): कळंब तालुक्याचा भूमिपुत्र व भोगजी गावचा रहिवासी डॉ. गोरख मुंडे यांनी नुकत्याच झालेल्या NEET PG 2025 परीक्षेत भारतातून ऑल इंडिया रँक 1090 मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून एवढा उच्चांक मिळवणे हे दुर्मिळ उदाहरण असून या कामगिरीबद्दल त्यांचा परिसरात उत्साहाने सत्कार करण्यात आला.
हा सन्मान सोहळा ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय अध्यक्ष, वारकरी संप्रदाय मंडळ) यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर, गावकरी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्याला प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये डॉ. रमेश जाधवर (प्रसिद्ध बालरोगतज्ञ), राजेंद्र बिक्कड (मुख्याध्यापक), बाळासाहेब कथले (स्व. गणपतराव कथले युवक आघाडी अध्यक्ष), महादेव खराटे (उद्योजक व शिवव्याख्याते), परमेश्वर पालकर (मराठवाडा अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य परिषद), रमेश अंबिरकर (पत्रकार),निशिकांत आडसूळ, गौतम जाधवर (मुख्याध्यापक), रामहारी मुंडे, अभिमान तांबडे, जनार्दन धुमाळे, बाबासाहेब कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी डॉ. मुंडे यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की –
“आजच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. भविष्यात डॉक्टरकीतून समाजातील गोरगरीब व दिनदलितांची सेवा करून आपला परिसर उज्ज्वल करावा,” असा संदेश त्यांनी दिला.डॉ. रमेश जाधवर यांनी अभिनंदन करताना म्हटले –
“मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. गोरख मुंडे यांचे यश ही फक्त शैक्षणिक कामगिरी नसून समाजासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव खराटे, प्रस्ताविक राजेंद्र बिक्कड तर आभार प्रदर्शन परमेश्वर पालकर यांनी केले.
डॉ. गोरख मुंडे यांचे यश हे कळंब तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या चिकाटी, परिश्रम आणि जिद्दीने साध्य केलेले हे यश भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.
