धोकादायक रस्त्यांवरून संतापाचा स्फोट – आ. कैलास घाडगे पाटील यांचा प्रशासनाला खडा सवाल
नवमत प्रतिनिधी | कळंब
कळंब-लातूर रस्त्यावरील खडकी गावाजवळील अरुंद पुलावर झालेल्या भीषण अपघातात प्रशांत महाजन व मंगेश महाजन या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला सहा महिने उलटून गेले तरीही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने आमदार कैलास घाडगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, “आता जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल,” असा तीव्र इशारा त्यांनी दिला आहे.
हा अपघात १५ फेब्रुवारी २०२५ रोजी रामा-२३६ या कळंब-लातूर रस्त्यावरील अरुंद पुलावर झाला होता. पुलाजवळ कोणताही दिशादर्शक फलक नसल्याने आणि पुलाचे रुंदीकरण न झाल्याने वाहन चालकांना मार्गाचा अंदाज येत नाही. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली. संबंधित रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, काम पूर्ण न झाल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी १० मे २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात संबंधित अभियंता व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची स्पष्ट मागणी केली होती. मात्र अजूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येते, असे आमदारांनी स्पष्ट केले.
अपघातानंतरही ठोस पावले नाहीत
खडकी गावाजवळील अरुंद पुलावरून झालेल्या अपघातानंतर, कळंब पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. परंतु या अहवालावर काय कारवाई झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर संताप – #JusticeForRamesh ट्रेंडमध्ये
यापूर्वी करंजकल्ला गावाजवळील वळणावर रमेश होनराव या युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर “#JusticeForRamesh” हा हॅशटॅग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला होता. परिणामी, कळंब-शिराढोण-लातूर मार्गावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आमदारांची ठाम भूमिका
“कळंब-शिराढोण-लातूर मार्गावरील रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. अनेक निरपराध युवकांना प्राण गमवावे लागत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. प्रशासन जर वेळीच पावले उचलत नसेल, तर आता जनतेला रस्त्यावर उतरावे लागणार आहे,”
— आ. कैलास घाडगे पाटील
नवमत पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तर जनआंदोलनाच्या शक्यता नाकारता येणार नाहीत.
