धाराशिव: शहरातील मूलभूत नागरी सुविधा पुरवताना राजकीय कुरघोडीमुळे सामान्य नागरिकांचा छळ होऊ नये, याची दक्षता घ्या, अशी ठणकावून सूचना आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी नागरी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा आग्रह धरला.
या बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद सीईओ मैनाक घोष, तहसीलदार मृणाल जाधव, नगर परिषद मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, “रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. 140 कोटींच्या विकासकामांसाठी फेरनिविदांची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी.” त्यांनी नियोजन समितीच्या स्थगित कामांकडेही लक्ष वेधले.
शहरातील पथदिवे, नालेसफाई, व कचरा व्यवस्थापन यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. “अंधारात सण साजरे करता येणार नाहीत. दिवाबत्ती खरेदी करावी, गटारी वेळेवर साफ न झाल्यास नव्या निविदा काढा,” असे ते म्हणाले.
कामांची गुणवत्ता निकृष्ट असल्यास बिल थांबवा आणि कामे पुन्हा दर्जेदार करण्याचे आदेश द्या, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.
बायोमायनिंग प्रकल्पाबाबत पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या साडेचार कोटींच्या निधीच्या अंमलबजावणीचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
नागरिकांच्या तक्रारी वाढत असून, यापुढे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. कामचुकार अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा आणि निष्काळजी ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असा थेट इशाराही आमदार पाटील यांनी दिला.