देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
तेरणा हॉस्पिटलतर्फे मोफत शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्डची सुविधा उपलब्ध
कळंब (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, नेरूळ नवी मुंबई यांच्या वतीने सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत श्री. हनुमान मंदिर पुनर्वसन सावरगाव, कळंब येथे होणार आहे.
शिबिराचे मार्गदर्शन व आयोजन
या शिबिराचे मार्गदर्शन मा. आमदार रणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केले असून, आयोजनासाठी स्थानिक नेतृत्वाने विशेष पुढाकार घेतला आहे.
शिबिरातील सेवा
या शिबिरामध्ये नेरूळ येथील तज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर तपासणी व औषधोपचार करण्यात येतील.
- हृदयरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, अस्थीरोग, पोटाचे विकार आदी विभागातील रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जातील.
- ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, अशा रुग्णांवर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी मुंबई येथे पूर्णतः मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल.
- नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड देखील काढून दिले जाणार आहे.
स्थानिक नेत्यांचे आवाहन
या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप कळंब तालुकाध्यक्ष मकरंद पाटील, नेते संदीप बावीकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष विकास कदम, सचिव परशुराम देशमाने यांनी केले आहे.
