कळंब शहरातील गोरगरिबांसाठी काँग्रेसकडून घरकुलांची मागणी
शहरातील शासकीय व गायरान जमिनींवर घरकुल योजना राबवावी, प्रशासनाकडे निवेदन
कळंब (प्रतिनिधी): कळंब शहरातील गोरगरीब कुटुंबांना निवारा मिळावा यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तहसीलदार व पालकमंत्री यांच्याकडे विशेष निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात शहरातील शासकीय जमिनी व गायरान जमिनीवर गरीब व मजुरांसाठी घरकुल योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन काँग्रेसचे शहराध्यक्ष शशिकांत निरफळ यांनी तहसील कार्यालयात सादर केले. यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात रोहित कसबे , वाजिद काझी, बबन हौसलमल, अरविंद हजारे, सिद्धेश्वर खैरमोडे, विशाल वाघमारे, महादेव गायकवाड यांचा समावेश होता.
निवेदनानुसार कळंब शहरातील शासकीय व गायरान जमिनींचा योग्य वापर करून गरीब व वंचित घटकांना घरकुल योजना मिळणे ही काळाची गरज असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत तहसीलदार व प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
