कळंबस्थानिक बातम्या

कळंब नगरपरिषदेवर काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्धार!

कळंब (प्रतिनिधी) : आगामी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर उतरण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. नगराध्यक्षपदासह सर्व २० नगरसेवक पदांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू असून, यासाठी संघटन पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाचे प्रभारी दादासाहेब मुंडे, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव स्मिता शहापूरकर, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार, तसेच वरिष्ठ नेते भागवत धस आणि ज्योती सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान तालुका काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब शेळके यांनी भूषविले.

बैठकीदरम्यान आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची व्यापक रणनीती आखण्यात आली. संघटन मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकांपर्यंत काँग्रेसच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी विविध कृती आराखडे निश्चित करण्यात आले. घराघरात संपर्क मोहीम, जनतेच्या स्थानिक समस्यांवर ठोस उपाय सुचवणे, आणि तरुण मतदारांना जोडण्यासाठी नव्या उपक्रमांची आखणी करण्यावर भर देण्यात आला.

या वेळी शशिकांत निरफळ, हरीभाऊ कुंभार, दिलीप देशमुख, शंकर करंजकर, रवी ओझा, विलास करंजकर, अंजली ढवळे, सचिन गायकवाड, भूषण देशमुख, रोहित कसबे, शीलानंद शिनगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी “कळंब नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा” दृढ संकल्प व्यक्त केला. एकजुटीने आणि उत्साहाने पक्षाच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

काँग्रेसच्या या तयारीमुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत कळंब मतदारसंघात रंगतदार सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!