कळंब येथे हजरत ख्वाजा हामिद अली शाह (र.अ.) दर्ग्याचा उर्स भाविकांच्या उत्साहात संपन्न
कळंब (प्रतिनिधी): कळंब येथील पवित्र दरगाहावर १५०० वा जश्ने ईद-ए-मिलादुन नबी आणि १३ वा उर्स मुबारक हजरत ख्वाजा हामिद अली शाह (र.अ.) यांचा ऐतिहासिक तीन दिवसीय सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ आदी विविध राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे कळंब नगरीत आध्यात्मिक वातावरणाचा अनोखा अनुभव लाभला.
१२ सप्टेंबर रोजी गुस्ल विधीने उरुस सोहळ्याची सुरुवात झाली. १३ सप्टेंबर रोजी ध्वजारोहण, संदल अर्पण व चिराग प्रज्वलन या पारंपरिक विधींसह दरगाह परिसरात भाविकांच्या गर्दीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रात्री प्रसिद्ध कव्वाल मंडळांच्या कव्वाली महफिलीने दरगाह परिसर भारावून गेला.
१४ सप्टेंबरला ख्वाजगान पठण सभा संपन्न झाली. आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. सज्जादानशीन हजरत डॉ. शाह ज़ाकिर हामिद (मदझिल्लाहु अली) यांनी आपल्या मार्गदर्शनातून शांती, मानवता, भाईचारा व सद्भावनेचा संदेश दिला. हैदराबादहून पधारलेल्या हजरत अनवरुल्लाह हुसेनी (मदझिल्लाहु अली) यांनीही उपस्थित भाविकांना आध्यात्मिक उर्जा व प्रेरणा दिली. त्यानंतर उशिरापर्यंत चाललेल्या कव्वालींच्या सुरावटीनं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
१५ सप्टेंबर रोजी झालेल्या फातेहा प्रार्थना कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या दिवशी कळंब तालुक्याचे पोलीस निरीक्षक चिंतले साहेब यांनी सहकाऱ्यांसह दरगाहावर हजेरी लावून दर्शन घेतले. आध्यात्मिक वातावरणाने प्रभावित होऊन त्यांनी उरुस व्यवस्थापनाचे कौतुक केले. त्यांचा मान्यवरांसह सत्कार करण्यात आला.
दरगाह व्यवस्थापन समितीने या तीन दिवसांत आलेल्या भाविकांसाठी उत्कृष्ट सुविधा पुरवल्या. निवास, भोजन व सर्व सोयीसुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. २४ तास सुरु असलेल्या लंगरमध्ये हजारो भाविकांना अन्नदानाचा लाभ घेता आला. दरगाह परिसर विद्युत रोषणाई, सजावट व जयघोषांनी उजळून निघाला होता.
या ऐतिहासिक उरुस सोहळ्याने भाविकांच्या श्रद्धेला नवी ऊर्जा दिली. हजारो भक्तगण कव्वालींच्या सुरावटी, आध्यात्मिक संदेश आणि दरगाहातील शांत वातावरणाने तृप्त झाले. सामाजिक ऐक्य, भाईचारा आणि मानवतेचा संदेश देणारा हा सोहळा कळंब नगरीत अविस्मरणीय ठरला.
