कळंब-लातूर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र रस्तारोको!
कळंब (प्रतिनिधी): कळंब ते लातूर दरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, ते अर्धवट अवस्थेतच रखडले आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्यावर खड्डे, अपूर्ण पूल आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, संतप्त नागरिकांनी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
खडकी येथील अपघातात प्रकाश महाजन आणि मंगेश महाजन या दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. या पार्श्वभूमीवर आमदार कैलासदादा पाटील यांनी दिनांक १० मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
याशिवाय करंजकल्ला येथे अलीकडेच झालेल्या अपघातात कळंब येथील युवक रमेश होनराव यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवसेना कळंब तालुक्याच्यावतीने आज तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपाचे रस्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या वेळी निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे, प्रदीप मेटे, प्रा. दिलीप पाटील, संजय मुंदडा, पंडित देशमुख, डॉ. संजय कांबळे, विश्वजीत जाधव, सागर मुंडे, शामराव खबाले, मंदार मुळीक, विनोद पवार, गोविंद जोगदंड, संतोष लांडगे, आबासाहेब मुळीक, निखिल कापसे, समाधान बाराते, शशिकांत पाटील, उत्तरेश्वर चोंदे, पुरुषोत्तम चाळक, निर्भय घुले, विकास हौसलमन, संतोष पवार, रवींद्र हिंगमिरे, नदीम मुलाणी, राकेश जगताप, संतोष एखंडे, खंडू लांडगे, हर्षवर्धन पाटील आणि इतर असंख्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
