गाव अंधारात, प्रशासन गाफील
कळंब शहरात आणि तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. काही ठिकाणी दिवसा ५-६ तास तर रात्री संपूर्ण वेळ वीज गायब असते. या सततच्या वीज खंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून शेतकरी, विद्यार्थी, दुकानदार आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
तक्रारींचं कुणालाच सोयरसुतक नाही
महावितरण कार्यालयात वारंवार संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. कर्मचारी “लाइनवर काम सुरू आहे”, “थोड्या वेळात लाईट येईल” अशा साचेबद्ध उत्तरांनी थातुरमातुर समजूत घालतात. काही वेळा तर फोनही उचलले जात नाहीत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत, अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा वारंवार अनुभवास येतो आहे.
शेतीवर मोठा परिणाम
शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी मोटारपंप वापरणे आवश्यक असते. मात्र, वीज नसल्यामुळे मोटारी बंद असून पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिकांना फटका बसत आहे.
“वीजपुरवठा नियमित नाही, पाणी काढता येत नाही. पीक करपून जाण्याची भीती आहे. आम्ही कुणाकडे जाणार?”
– स्थानिक शेतकरी
व्यवसाय, शिक्षणावरही परिणाम
दुकानदार: लाईट नसल्यामुळे दुकानांतील फ्रीज, कंप्युटर, स्वाईप मशीन बंद असतात. ग्राहकांशी व्यवहार करताना अडचणी येतात.
विद्यार्थी: ऑनलाईन शिक्षण, अभ्यासासाठी विजेची गरज असते. लाईट नसल्याने अभ्यासात खंड पडतो आहे.
महावितरणची मनमानी
स्थानिक जनतेचा आरोप आहे की, महावितरण विभाग कळंब येथे पूर्णतः बेजबाबदार झाला आहे. वेळेवर बिलं भरली जात असतानाही, लाईन मनमानी पद्धतीने बंद केली जाते. एखादी खंडित लाईन तासाभरात दुरुस्त होऊ शकते, पण ती तासनतास तशीच ठेवली जाते. काही वेळा दिवसभरात चार-पाच वेळा लाईट जाते.
मागणी काय?
- सततचा वीजपुरवठा सुरू ठेवावा.
- दुरुस्तीसाठी तातडीने कर्मचारी पाठवावेत.
- तक्रारींसाठी प्रभावी यंत्रणा सुरू करावी.
- मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
जनतेचा इशारा
जर लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर कळंब व परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.