कळंबमधील महात्मा फुले चौकाचा कायापालट लवकरंच!
कळंब (प्रतिनिधी) : शहरातील महात्मा फुले चौकाचे सुशोभीकरण आणि विकास लवकरच होणार आहे. या चौकात क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सुंदर शिल्प उभारण्यात येणार आहे.
या कामासाठी कळंब येथील महात्मा फुले चौक पुतळा कृती समितीने आमदार कैलास पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आमदार पाटील यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर करून चौकाचा कायापालट लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
हा चौक शहराच्या मध्यभागी असून तहसील कार्यालयासमोर आहे. याठिकाणी महात्मा फुले यांचे नाव असूनही आजवर चौकाचे योग्य सुशोभीकरण झालेले नव्हते. आता निधी मिळाल्यानंतर चौकात विकासकामे सुरू होतील.
या बैठकीत कृती समितीचे अध्यक्ष टी. जी. माळी, पांडुरंग कुंभार, डॉ. राजेंद्र गोरे, अरुण माळी, बिभीषण यादव, संतोष भोंजने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
