उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे सोनोग्राफी सेंटर सुरू – दर बुधवारी गरोदर महिलांसाठी मोफत तपासणी
कळंब (प्रतिनिधी): उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे गरोदर महिलांसाठी आवश्यक असलेल्या सोनोग्राफी तपासणीसाठी स्वतंत्र सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. या सेवेचा शुभारंभ आमदार कैलास (दादा) पाटील यांचे प्रतिनिधी व रुग्ण कल्याण समिती सदस्य गोविंद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. रामकृष्ण लोंढे, वैद्यकीय अधिकारी तथा स्त्री रोग तज्ञ डॉ. सायस केंद्रे, डॉ. पुरुषोत्तम पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गायकवाड, दत्तप्रसाद हेड्डा, विजय पवार व इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले की, हे सोनोग्राफी सेंटर दर बुधवारी केवळ गरोदर मातांची तपासणी करण्यासाठी सुरू राहणार आहे. गरजेनुसार त्याचा विस्तार व सुविधा देखील वाढवण्यात येतील.
या सुविधेची मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, स्थानिक नागरिक व पत्रकार बंधूंनी वेळोवेळी लावून धरली होती. अखेर ही मागणी यशस्वी ठरली असून सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रुग्ण कल्याण समितीचे सदस्य गोविंद चौधरी यांनी सांगितले की, “भविष्यात अशा प्रकारच्या सुविधा अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार असून ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य सेवा सुलभ होतील.”