कळंबस्थानिक बातम्या

कळंब येथे तेरणा ट्रस्टचे भव्य आरोग्य शिबिर – 673 रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी; 72 गंभीर रुग्णांवर पुढील उपचार मुंबईत होणार

कळंब (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब शहरातील श्री हनुमान मंदिर, पुनर्वसन सावरगाव येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, नेरुळ (नवी मुंबई) यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन मंदिरातील हनुमान मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून करण्यात आले. या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात तेरणा ट्रस्टचे संचालक अशोकराव शिंदे, तालुकाध्यक्ष मकरंद पाटील, हनुमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष काळे सर, मुख्याध्यापक मुकुंद नांगरे, दयावान प्रतिष्ठान अध्यक्ष इम्रान मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी गिड्डे पाटील, माणिक बोंदर, संदीप बावीकर, किशोर वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.

मुंबई येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टर – डॉ. सुनीता, डॉ. ऋग्वेदा, डॉ. श्रुती, डॉ. दीक्षा यांनी विविध आजारांवरील तपासणी केली. या शिबिरात ह्रदयरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग आदी विभागांतील 673 रुग्णांची तपासणी करण्यात आली. गंभीर आजार निदान झालेल्या 72 रुग्णांवर पुढील उपचार मुंबई येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली केले जाणार आहेत.

यावेळी मोफत औषधे वाटप करण्यात आली तसेच ज्या रुग्णांकडे आयुष्यमान भारत योजना कार्ड नव्हते त्यांची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना कार्ड उपलब्ध करून देण्यात आले.

कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव व गांधीनगर भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिराचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष विकास कदम व सरचिटणीस परशुराम देशमाने यांनी केले.

“तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून आमचे नेते, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळे दरवर्षी हजारो रुग्णांचे प्राण वाचत आहेत. लाखो रुग्णांना मोफत औषधोपचार व इतर सेवा उपलब्ध होत आहेत.”

– विकास कदम,कळंब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!