अपघातांच्या पार्श्वभूमीवर कळंबकरांचा आवाज : रस्त्यावर तातडीने गतीरोधक बसवा
शाळा–महाविद्यालय परिसरात वाढती वाहतूक; सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांचे निवेदन
कळंब (प्रतिनिधी): खामगाव–पंढरपूर मार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने गतीरोधक (स्पीड ब्रेकर) व सूचना फलक बसविण्याची मागणी केली आहे.
कळंब शहरातून जाणारा हा महामार्ग दररोज हजारो वाहनांनी गजबजलेला असतो. या मार्गावर कोर्ट, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, एमएसईबी ऑफिस, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये अशा महत्त्वाच्या ठिकाणांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व विद्यार्थ्यांची वर्दळ असते.
मात्र येथे गतीरोधक किंवा योग्य सूचना फलक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गेल्या १५ दिवसांत दोन मोठे अपघात झाले असून त्यात एकाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच एम.एस.आर.डी.सी कार्यालय, जालना यांना संबोधित निवेदन देत पुढील मागण्या केल्या आहेत :
- खामगाव–पंढरपूर मार्गावर तातडीने गतीरोधक बसवावेत.
- शाळा, महाविद्यालय परिसरात सूचना फलक व वाहतूक नियंत्रणासाठी चिन्हे लावावीत.
- नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष पथके तैनात करावीत.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा नागरिकांचे प्राण वाया जाण्याची भीती आहे.
नागरिकांनी दिलेल्या या निवेदनावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या असून तातडीची कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
