बँकांनो खबरदार, शेतकऱ्यांचे खाते कोणत्याही कारणाने होल्डवर ठेवू नका
महसूल राज्यमंत्र्यांचे निर्देश; 15 दिवसांत मदत जमा होणार
लातूर (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीवर शासनाकडून तातडीने मदत दिली जात असल्याची माहिती महसूल राज्य मंत्री योगेश कदम यांनी दिली. त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे पंचनामे वेळेत, अचूक आणि प्रत्यक्ष पाहणी करून करण्यात यावेत.
ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४४ कोटी रुपयांची मदत वितरित केली आहे. ही रक्कम येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. याबाबत बँकांनी कोणत्याही कारणाने रक्कम होल्डवर ठेवू नये, असे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले.
तथापि, सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे आणखी मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या अतिरिक्त नुकसानीचेही पंचनामे करून मदत दिली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी जनावरांचा चारा वाहून गेला असून, जनावरांना चार्याची उपलब्धता करून देणे आवश्यक असल्याचे मंत्री कदम म्हणाले. पशुसंवर्धन विभागाने तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये वीज रोहित्रे, वीजवाहिन्या यांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुरुस्तीसाठी मिशन मोडवर मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पूल, रस्ते, शिवारस्ते दुरुस्तीसाठीही मोहीम राबविण्यात येणार आहे.
पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना कापणी प्रयोगांच्या निकालावरून विमा मिळणार आहे. त्यामुळे कापणी प्रयोग अधिक अचूक होण्यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असेही महसूलमंत्र्यांनी सांगितले.
लातूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे, तहसीलदार, कृषी व बँक अधिकारी, तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या निर्णयांमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी व जनावरधारकांना दिलासा मिळणार असून, पुढील काळात कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.
