महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवचा मानाचा ठसा
कळंबचा सत्यजीतराजे राज्यात चौथा, वसुंधरा नांगरे विजेतेपदावर
कळंब (प्रतिनिधी): मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे नुकत्याच पार पडलेल्या 48 व्या महाराष्ट्र स्टेट ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे.
सत्यजीतराजे कात्रेचा चौथा क्रमांक
कळंबचे सुपुत्र सत्यजीतराजे चेतन कात्रे याने 9 वर्ष वयोगटात महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावून धाराशिव जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले. त्याच्या चिकाटीला आणि परिश्रमाला संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इतर खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
- वेदांत शिंदे – 11 वर्ष वयोगटात महाराष्ट्रात पाचवा क्रमांक.
- विवेक शिंदे – 15 वर्ष वयोगटात सहावा क्रमांक.
- वसुंधरा नांगरे – 17 वर्ष वयोगटात विजेतेपदाचा मान पटकावला.
या यशामुळे कळंबसह संपूर्ण धाराशिव जिल्हा आनंदून गेला असून तरुणाईमध्ये क्रीडाविषयक प्रेरणा निर्माण झाली आहे.
मार्गदर्शकांचे योगदान
या सर्व विजेत्या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे राजाभाऊ शिंदे, अभिनव सर, रवी नवले सर आणि करण सर यांचे कार्य विशेष कौतुकास्पद आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्यस्तरावर यश मिळविण्याची संधी लाभली आहे.
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
या कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, पालक, मार्गदर्शक तसेच क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे उत्साहाने स्वागत केले असून कळंबसह संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
