कळंब : शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस शाळा आणि महाविद्यालयीन वयोगटातील मुले मोटारसायकल, स्कूटर व क्वचित प्रसंगी चारचाकी गाड्याही बेधडकपणे चालवताना दिसून येतात. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार “दिवसेंदिवस हे लहान मुले रस्त्यावर सुसाट वेगात गाड्या चालवत आहेत. ना हेल्मेट असतं, ना नियंत्रण. कधी कुठे कोणाला धडक देतील याचा भरवसा नाही. गंभीर बाब म्हणजे अनेक पालक स्वतः मुलांना गाड्यांच्या चाव्या देतात. अनेक वाहनांना नंबर प्लेट नाही किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवली जाते. रस्त्यावर वाहन उडवण्याच्या स्पर्धा काही भागांत रात्री सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी या विषयावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांची माहिती, अपघातांचे परिणाम आणि कायद्याचे गांभीर्य समजावून सांगणं आता आवश्यक बनले आहे.
स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना:
सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचालकांची ओळख पटवणे
पालकांसाठी जनजागृती बैठकांचे आयोजन
वाहतूक पोलिसांच्या गस्तीत वाढ
अल्पवयीन वाहनचालकांचा वाढता सुळसुळाट हा केवळ कायद्याचा भंग नाही तर मानवी जिवाशी खेळ आहे. याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर हे निष्काळजीपण मोठ्या दुर्घटनांचे कारण ठरू शकते.