पालावरच्या अभ्यासिकेतून दररोज २५३ विद्यार्थी घेतात शिक्षण; भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानने सहा हजार विद्यार्थ्यांना आणले मुख्य प्रवाहात
१५ वर्षांत धाराशिव जिल्ह्यातील ८ ठिकाणी अभ्यासिकेतून मुलांना शिक्षण, आरोग्य आणि शासकीय योजनांचा लाभ; अनेकांनी पूर्ण केले दहावी-बारावीचे शिक्षण
धाराशिव (प्रतिनिधी): गावोगावी विखुरलेल्या आणि हातावर पोट असलेल्या भटक्या-विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धाराशिव येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान परिषदेतर्फे गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यात ८ ठिकाणी पालावरची अभ्यासिका उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून दररोज सायंकाळी २५३ विद्यार्थी अभ्यासिकेत हजेरी लावत असून, आतापर्यंत सहा हजारांहून अधिक विद्यार्थी मुख्य प्रवाहात दाखल झाले आहेत.
८ ठिकाणी अभ्यासिकेचे जाळे
धाराशिव शहरातील वडार गल्ली, बंजारा वस्ती, वासुदेव वस्ती, उमरग्यात मसनजोगी भिल्ल समाज वस्ती, नळदुर्ग येथील मरीआई समाज वस्ती, तुळजापूरातील हंगरगा व वैद्य समाज वस्ती, तसेच येडशीतील राजगुंड समाज वस्ती अशा ८ केंद्रांवर हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे. या माध्यमातून शिक्षणापासून दूर असलेल्या ३०० हून अधिक मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला आहे.
प्राथमिकतेपासून उच्च शिक्षणापर्यंत
अक्षरज्ञान, लेखन, वाचनाचे धडे शिक्षक रेणुका जाधव आणि स्वाती सातपुते देतात. अर्धवट शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा शालेय प्रवाहात आणले जाते. अनेक विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी आणि उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
उपस्थिती आणि यश
वडार वस्ती अभ्यासिकेत ४२, बंजारा वस्ती अभ्यासिकेत ४४, वासुदेव वस्ती अभ्यासिकेत ३६ विद्यार्थी, तर इतर केंद्रांसह एकूण २५३ विद्यार्थी रोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अभ्यासिकेत हजेरी लावतात. या उपक्रमातून आतापर्यंत ५८५८ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत.
शिक्षणाबरोबरच आरोग्य व योजना लाभ
प्रतिष्ठानतर्फे महिला बचत गट निर्मिती, महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, लसीकरण, तसेच शासकीय योजना लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून दिली जातात. यामुळे शिक्षणासह आरोग्य आणि योजनांचा लाभ समाजातील अनेकांना मिळत आहे.
शिक्षकांचे समाधान
“हलाखीच्या परिस्थितीमुळे आणि पालकांच्या अज्ञानामुळे आम्हाला जास्त शिकता आले नाही. पण या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी रोज दोन तास देता येतात, याचा मला खूप आनंद आहे,” असे पालावरच्या अभ्यासिकेच्या शिक्षिका स्वाती सातपुते यांनी सांगितले.
या उपक्रमामागे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव काळे, निरीक्षक शेखर पाटील व इतर शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
