कळंबस्थानिक बातम्या

राखी ते खाकी : इनरव्हील क्लब ऑफ कळंबचा अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम

कळंब (प्रतिनिधी): रक्षाबंधनाच्या पावन दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ कळंबने “राखी ते खाकी” या आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून पोलीस बंधूंना सन्मानित करत पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा केला.

पर्यावरणपूरक राख्यांनी दिला अनोखा संदेश

इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी व संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालय, कळंब येथील विशेष विद्यार्थ्यांनी मिळून विविध झाडांच्या बियांपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या राख्या कळंब पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, अधिकारी व पोलीस बांधवांना बांधण्यात आल्या. यामागचा उद्देश केवळ राखी सण साजरा करणे नसून, पर्यावरण संवर्धनाचा संदेशही समाजापर्यंत पोहोचवणे हा होता.

सेवा व संस्कारांची प्रेरणा

कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष डॉ. प्रा. मीनाक्षी भवर (शिंदे मॅडम) यांनी इनरव्हील क्लबचे जागतिक पातळीवरील सेवा व मैत्री या मूल्यांवर आधारित कार्य, तसेच कळंब क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती पोलीस निरीक्षक चिंतले यांना दिली.
चिंतले यांनी क्लबच्या कार्याचे कौतुक करत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम उपक्रम रुजवण्याचे आवाहन केले.

क्लबच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा भवर यांची भावना

क्लबच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे) यांनी, “संस्कृती रुजवण्यासाठी मार्गदर्शनासोबत कृती करून दाखवू,” असे स्पष्ट केले. तसेच, “तुम्ही सर्वजण महिला वर्गाचे रक्षण करत असल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत,” असे म्हणत पोलीस दलाचे आभार मानले.

उपक्रमामागील सहकार्य

या उपक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन म्हणून माजी अध्यक्षा डॉ. प्रा. वर्षा जाधव यांनी काम पाहिले. त्यांना अध्यक्षा सौ. प्रतिभा भवर, सचिव डॉ. दिपाली लोंढे, माजी अध्यक्ष डॉ. प्रा. मीनाक्षी भवर, सौ. राजश्री देशमुख (डिस्ट्रिक्ट ३१३ सब कोऑर्डिनेटर), C.C. सौ. संगिता घुले, आणि ISO सौ. दिपाली कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

या “राखी ते खाकी” उपक्रमातून एकाच वेळी बंधुत्व, संस्कार आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देत इनरव्हील क्लब ऑफ कळंबने समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!