गरीब मुलींच्या हस्ते राखी बांधून कपड्यांचे वाटप – रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम
कळंब (प्रतिनिधी): रक्षाबंधन हा भावंडांच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि नात्याच्या घट्ट बंधाचा सण. या दिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची व सुख-समृद्धीची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या संरक्षणाची ग्वाही देतो. परंतु यंदा जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाने हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले.
स्वतःच्या कुटुंबासाठी पाल ठोकून जगणाऱ्या, रोजीरोटीची कसरत करणाऱ्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील ६ ते ११ वयोगटातील मुलींना या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आले. या चिमुकल्या बहिणींनी उपस्थित मान्यवरांच्या हातावर राखी बांधून, नात्यातील आपुलकी आणि स्नेहाचा धागा अधिक घट्ट केला. राखी बांधल्यानंतर प्रत्येक मुलीला नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात समाजसेवेची आवड असलेली प्रतिष्ठित मंडळी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान मुलींच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद सर्वांच्या मनाला भिडणारे होते.
जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी म्हणाले की, “रक्षाबंधनाचा खरा अर्थ फक्त आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता, तो समाजातील वंचित, गरजू घटकांपर्यंत पोहोचवणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.”
राखीच्या पवित्र धाग्यासोबतच, नवीन कपड्यांची भेट या मुलींसाठी आनंददायी ठरली. या उपक्रमातून भावंडांच्या प्रेमाचा सण अधिक अर्थपूर्ण आणि सर्वसमावेशक पद्धतीने साजरा झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
