शिंदे–सावंत यांची गुप्त भेट; दोन तासांच्या चर्चेने वाढवले तर्कवितर्क
मराठवाड्यातील प्रभावी आमदार आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट सत्ताकेंद्रातील अस्वस्थतेचे द्योतक?
धाराशिव (प्रतिनिधी): मुंबईतील एका भेटीने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातील पडद्यामागील घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आरोग्यमंत्री, परांड्याचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांची दोन तासांची बैठक ही साधी औपचारिक भेट नव्हे तर राजकीय संदेश देणारी निर्णायक हालचाल ठरत आहे.
सावंत यांनी स्वतः फेसबुकवरून या भेटीची माहिती जाहीर करणे हेच या भेटीचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरते. नेत्यांमध्ये नेहमीच संवाद घडत असतो परंतु जेव्हा तो उघडपणे लोकांसमोर मांडला जातो तेव्हा त्यामागे राजकीय संकेत लपलेले असतात. या भेटीदरम्यान चर्चिले गेलेले मुद्दे उघड न करता ठेवणे हेच संशयाला खतपाणी घालणारे ठरते.

शिंदे गट सत्तेत असला तरी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीपासून आगामी निवडणुकांच्या समीकरणापर्यंत अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद, भाजपाशी असलेले नाजूक संतुलन आणि राष्ट्रवादीच्या तिन्ही गटांमधील घडामोडी – या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि सावंत यांची बैठक हा ‘फक्त विकासावरचा संवाद’ नसावा, असा ठाम अंदाज राजकीय वर्तुळात घेतला जात आहे.
तानाजी सावंत हे केवळ आरोग्यमंत्री राहिलेले मंत्री नाहीत, तर मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांची ही दोन तासांची भेट केवळ प्रादेशिक मुद्द्यांवर झाली असे मानणे भोळसटपणाचे ठरेल. विशेषतः शिंदे गटाच्या सध्याच्या आव्हानात्मक राजकीय परिस्थितीत प्रत्येक हालचालीचे दूरगामी परिणाम होत असतात.
या भेटीमागे भविष्यातील संघटनात्मक फेरबदल, मंत्रिपदातील असंतोष किंवा निवडणुकीपूर्वीची अंतर्गत मांडवली यापैकी नेमके काय आहे, हे पुढेच स्पष्ट होईल. मात्र एवढे मात्र खरे की या दोन तासांच्या बैठकीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनिश्चिततेचे ढग पुन्हा गडद केले आहेत.
