डीजेला फाटा देत आझाद ग्रुपकडून ईद ए मिलादनिमित्त कळंब येथे सिरत उन नबी प्रश्नोत्तर स्पर्धा
कळंब (प्रतिनिधी): ईद ए मिलाद या सणाचे औचित्य साधून आझाद ग्रुपच्यावतीने पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनचरित्रावर आधारित सिरत उन नबी प्रश्नोत्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा येत्या ३१ ऑगस्ट रोजी (रविवार) इस्लामपुरा येथील गॅलेक्सी फंक्शन हॉल येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार असून, ग्रुप १ मध्ये ४थी ते ७वी तर ग्रुप २ मध्ये ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची उंची वाढावी आणि धार्मिक तसेच सामाजिक जाणीवा बळकट व्हाव्यात, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रुप १ मध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला कुलर, द्वितीय आणि तृतीय क्रमांकास कॉम्प्युटर स्टडी टेबल देण्यात येईल. तर ग्रुप २ मधील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सायकल, आणि द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर स्टडी टेबल बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी मुफ्ती फारुख बागवान, हाफिज खालेद, मौलाना शोएब, कारी दिलशाद यांच्याकडे करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, स्पर्धेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी व्हावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. डीजेला फाटा देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात असल्याचे आझाद ग्रुपचे उमरान मिर्झा यांनी सांगितले. हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.
