सुनील मार्केट पाण्याखाली, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान — नगर परिषद प्रशासन मौन
कळंब (प्रतिनिधी): नगरपरिषद इमारतीच्या तळमजल्याखालील मार्केटने पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः तलावाचे रूप घेतले आहे. पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहिल्याने अनेक व्यापाऱ्यांचा माल खराब झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे व्यापारी वर्ग हताश आणि संतप्त झाला आहे.
विशेष म्हणजे, आज नगर परिषदेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी तसेच माजी नगरसेवकही यावेळी उपस्थित होते. मात्र, सुनील मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांची ना कोणी दखल घेतली, ना त्यांच्या समस्यांची विचारपूस करण्याची तसदी घेतली.
व्यापारी संघटनेच्या मते, ही समस्या नवीन नाही. पावसाळ्यात वारंवार पाणी साचत असते, पण प्रशासनाकडून कायम दुर्लक्षच होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, नगर परिषद यावर कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्ष उपाययोजना करते का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
